
अहिल्यानगर:जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी पूजा महादेव गावडे व त्यांच्या कुटुंबीयांवर स्थानिक काही व्यक्तींकडून होत असलेल्या सततच्या अन्याय, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांविरोधात प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे अखेर या कुटुंबाने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे. स्थानिक आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्या मतदारसंघातील या गंभीर प्रकरणात प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी पीडित महिलेने आज (दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६) जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी मंत्रालय, मुंबईच्या दिशेने सहकुटुंब पायी चालत आंदोलनाला सुरुवात केली आहे.नेमकी पार्श्वभूमी आणि अन्याय काय?शासनाच्या दीनदयाळ योजनेतून जागा व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेल्या पूजा गावडे यांच्या घराला दार व चौकट बसवण्यात शेजारील गोरख मोहन खेडकर आणि मच्छिद्र मोहन खेडकर हे अडथळा आणत आहेत. रस्त्यावर अतिक्रमण करून कचरा टाकणे, ट्रॅक्टर व सरपण लावून त्रास देणे हे प्रकार सुरू आहेत.
याचा विरोध केल्यामुळे ग्रामसेवकांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून, आरोपींनी रात्रीच्या वेळी घरात घुसून पती महादेव गावडे आणि सासू ताराबाई गावडे यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जिवाच्या भितीने कुटुंबाने ११२ वर फोन करूनही मदत मिळाली नाही, उलट पोलिसांनी पीडित कुटुंबावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप आहे.
पती जिवाच्या भितीने गेल्या सहा महिन्यांपासून परगावी राहत असताना, आरोपींकडून रोज दारात येऊन अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात आहेत. यात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर लक्ष्मण महांडुळे यांनीही कोणतीही मदत न करता आरोपींचीच पाठराखण केल्याचे निवेदनात म्हटले आहे.हे प्रकरण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्या अंतर्गत येत असून, वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पातळीवर न्याय न मिळाल्यामुळे व प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे या कुटुंबाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
अहिल्यानगर ते मुंबई पायी प्रवासअखेर ठरल्याप्रमाणे आज (दि. ०२ नोव्हेंबर २०२६) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पूजा गावडे यांनी आपल्या कुटुंबातील महिला पूजा गावडे,सासू व 4 मुलींसह थेट मुंबईच्या मंत्रालयाकडे पायी चालत जाण्यास सुरुवात केली आहे.
जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करत नाहीत आणि कुटुंबाला पूर्ण संरक्षण देत नाहीत, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील, असा ठाम पवित्रा पीडित कुटुंबाने घेतला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








