ग्रामीण संस्कृती, विकास आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीचा अनोखा संगम; गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत.

गुणवडी:-आजचा दिवस गुणवडी (ता. बारामती) गावासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला. साऊथ कोरिया (दक्षिण कोरिया) येथील विद्यापीठाच्या (युनिव्हर्सिटी) आजी-माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आज गुणवडी गावाला सदिच्छा भेट दिली. गुणवडीच्या सरपंच सौ. प्राची रवींद्र घोडे यांच्या विशेष विनंतीला मान देऊन हा आंतरराष्ट्रीय दौरा आयोजित करण्यात आला होता. या भेटीदरम्यान परदेशी विद्यार्थ्यांनी गुणवडीच्या ग्रामीण संस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि विकासकामांचा मनसोक्त आनंद लुटला.
शाळकरी मुलांशी संवाद आणि गावची पाहणी
गावात आगमन झाल्यानंतर दक्षिण कोरियाच्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम या विद्यार्थ्यांनी गुणवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. तेथे त्यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधला. परदेशी पाहुणे आपल्यात आल्याचे पाहून शालेय मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातील आरोग्य उपकेंद्र दवाखाना, ऐतिहासिक हनुमान मंदिर आणि कऱ्हा नदी परिसर यांसह विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. गावातील स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण पाहून परदेशी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
“ही भेट केवळ एक दौरा नसून, दोन देशांतील संस्कृती, मैत्री आणि ग्रामीण विकासाच्या अनुभवांची सुंदर देवाणघेवाण ठरली आहे. भविष्यात अशा आंतरराष्ट्रीय संवादातून गुणवडी गावाच्या विकासाला नक्कीच एक नवी दिशा मिळेल.”
सौ.प्राची रवींद्र घोडे (सरपंच, गुणवडी)ग्रामस्थांची मोठी उपस्थिती या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळासोबत गावातील विविध ठिकाणच्या पाहणी दौऱ्यात सरपंच सौ. प्राची रवींद्र घोडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गावडे, सुयश गावडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र घोडे, ग्रामसेविका वर्षा लोणकर, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि गुणवडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या गावची संस्कृती आणि परंपरा समजावून सांगण्यात सर्वांनी उत्साहाने भाग घेतला.
प्रशासनाकडून उत्तम नियोजन; मानले आभार या ऐतिहासिक आणि कौतुकास्पद आंतरराष्ट्रीय भेटीचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. या यशस्वी आयोजनाबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेविका), ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व गुणवडी ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. गुणवडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हा गौरवशाली क्षण सर्व परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.








