
बारामती प्रतिनिधी:बारामती शहर आणि तालुक्यामध्ये सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर फटाका स्टॉल्सवर प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. ‘बारामती फटाका असोसिएशन’ने थाटलेल्या या नियमबाह्य फटाका मार्केटविरोधात अर्जदार निलेश गजरमल आणि जया गुंदेचा यांनी रीतसर तक्रारी अर्ज दिले आहेत. मात्र, तक्रार देऊनही प्रशासन सुस्त असल्यामुळे “प्रशासन बारामती फटाका असोसिएशनवर एवढे मेहरबान का? आणि नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हे बेकायदेशीर दुकानं सजली आहेत?” असा संतप्त सवाल आता बारामतीकर नागरिक विचारत आहेत.
या संदर्भात बारामतीचे उपविभागीय प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले होते की, “आम्ही नियमांची योग्य पडताळणी केल्याशिवाय फटाका विक्रीस कोणतीही परवानगी देणार नाही.”
अद्याप अधिकृत परवानगी दिली नसतानाही बारामती शहर व तालुक्यात ठिकठिकाणी फटाका स्टॉल्स लागलेच कसे? असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या भूमिकेनंतरही जर स्टॉल्स उघडले गेले असतील, तर असोसिएशन प्रशासनाला जुमानत नाही का? की शासकीय यंत्रणेच्या संमतीनेच हा बेकायदेशीर प्रकार सुरू आहे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
सुरक्षेचे नियम कागदावरच; शासकीय नियमांनुसार फटाका स्टॉल्स उभारण्यासाठी अग्निशामक दलाचे NOC, योग्य अंतर, वाळू-पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षा परवाने अत्यंत आवश्यक असतात. परंतु, ‘बारामती फटाका असोसिएशन’च्या माध्यमातून इंदापूर रोडला व शहरात अतिशय दाटीवाटीने आणि उघड्यावर हे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे बेकायदेशीर फटाके विक्री सुरू असल्याने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
अर्जदार निलेश गजरमल आणि जया गुंदेचा यांनी दिलेल्या तक्रार अर्जांवर तातडीने पावले उचलून हे बेकायदेशीर स्टॉल्स हटवले जाणार की प्रशासन कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली गप्प बसणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने या बेकायदेशीर स्टॉल्सवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निलेश गजरमल आणि जया गुंदेचा यांनी दिला आहे.








