‘इंटक’चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गजरमल यांचा मुख्याधिकार्यांना इशारा; कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ.

बारामती (प्रतिनिधी):बारामती नगरपरिषदेच्या वतीने चालवण्यात येणारा अधिकृत कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आल्यामुळे स्थानिक कुरेशी समाज, कामगार आणि मांस व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा कत्तलखाना नियमांची पूर्तता करून तातडीने पूर्ववत सुरू करावा, अन्यथा लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री. निलेश गजरमल यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुरेशी समाज आणि म्हैस व रेडा (मांस) व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी ‘इंटक’च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना अंदोलनाचे अधिकृत निवेदन सुपूर्द करण्यात आले.
कत्तलखाना बंद झाल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीरनिवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन १९९० पासून बारामती येथील अधिकृत कत्तलखाना हा नगरपरिषदेच्या मालकीखाली व देखरेखीखाली कायदेशीररीत्या सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासूनj पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांना पास (सर्टिफिकेट) देणे जाणीवपूर्वक बंद केले असून, ते रजेवर निघून गेले आहेत. कोणाच्या सांगण्यावरून हा खोडसाळपणा सुरू आहे? आणि कत्तलखाना बंद करण्याचे काही वरिष्ठांचे आदेश असतील तर त्याची प्रत व्यापाऱ्यांना मिळावी, अशी मागणी गजरमल यांनी केली आहे.या अचानक घेतलेल्या अन्यायकारक निर्णयामुळे शेकडो गरीब व्यापारी, कामगार आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच म्हैस व रेडा विक्री करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
“कत्तलखाना नगरपरिषदेच्या मालकीचा आहे. त्यामुळे तिथे पर्यावरण, स्वच्छता आणि तांत्रिक नियमांची पूर्तता करणे ही जबाबदारी प्रशासनाची आहे. स्वतःच्या त्रुटी लपवण्यासाठी थेट कत्तलखाना बंद करून गरिबांना वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे नगरपरिषदेचा महसूलही बुडत आहे.“निलेश गजरमल(उपाध्यक्ष, इंटक पुणे जिल्हा)
गोवंश हत्येवरील कारवाईचे समर्थन, पण वैध व्यापाऱ्यांना त्रास नको!शासन आणि प्रशासनाने बेकायदेशीर गोहत्या करणाऱ्या समाजकंटकांवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे जे आदेश दिले आहेत, त्याचे आम्ही पूर्ण समर्थन करतो, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. बारामती परिसरात कुठेही बेकायदेशीर गोवंश हत्या होत असेल, तर प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यात आमचे पूर्ण सहकार्य राहील. परंतु, अधिकृत कत्तलखान्यात केवळ शासनमान्य म्हैस व रेडा या जनावरांचीच नियमानुसार कत्तल केली जाते. त्यामुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या वैध व्यापाऱ्यांना प्रशासनाने नाहक त्रास देऊ नये आणि सहकार्य करावे, अशी मागणी निलेश गजरमल(उपाध्यक्ष, इंटक पुणे जिल्हा) यांनी केली आहे.
आंदोलनाचा इशाराबारामती नगरपरिषद आणि पशुवैद्यकीय विभागाने तांत्रिक व पर्यावरण नियमांची तात्काळ पूर्तता करावी आणि बंद असलेला कत्तलखाना पूर्ववत सुरू करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा. या निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास, व्यापाऱ्यांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे सनदशीर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा निलेश गजरमल यांनी दिला आहे.









