
बारामती | प्रतिनिधी
नवरात्रीनिमित्त माळावरची देवी परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या करमणुकीच्या पाळण्यांबाबत सुरक्षेच्या उपाययोजना, परवानगीतील अटी आणि Public Liability Insurance (सार्वजनिक दायित्व विमा) यासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
“नवरात्रीच्या आठ-दहा दिवसांत सर्वसामान्य नागरिक आणि भाविक भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या या व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?”
असा थेट सवाल तक्रारदार निलेश गजरमल यांनी केला आहे.नागरिकांना तक्रारदाराचे आवाहन — पाळण्यांमध्ये बसताना काळजी घ्या!माळावरची देवी येथे मोठ्या संख्येने महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक दर्शनासाठी येत आहेत.
त्यामुळे संबंधित पाळण्यांमध्ये बसण्यापूर्वी नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, वैध परवानग्या आणि विमा याबाबत खात्री करावी, असे आवाहन गजरमल यांनी केले आहे.
“नागरिकांच्या सुरक्षेची पुरेशी खात्री नसताना पाळण्यांमध्ये बसणे टाळावे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा प्रशासनाने आधीच सुरक्षा तपासणी करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाच-सहा दिवसांपासून पाठपुरावा; तरीही माहिती मिळत नसल्याचा दावा तक्रारदार निलेश गजरमल यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या पाच-सहा दिवसांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.
संबंधित पाळण्यांसाठी बारामती नगरपरिषद, बारामती शहर पोलीस ठाणे तसेच इतर संबंधित विभागांनी कोणत्या परवानग्या दिल्या आहेत? त्या परवानग्यांमध्ये कोणत्या अटी आहेत? त्या अटींचे पालन होत आहे का? तसेच संबंधित पत्रव्यवहार काय झाला? याची माहिती त्यांनी मागितली आहे.
मात्र, अद्याप स्पष्ट माहिती किंवा कारवाईबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.“प्रशासन संबंधित व्यवसायिकाला वाचवत आहे का?”तक्रारदाराने संबंधित व्यवसायिक पांडुरंग चव्हाण यांच्या पाळण्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
परवानग्या दिल्या असतील तर त्यातील सर्व अटींचे पालन होत आहे का, याची प्रत्यक्ष तपासणी प्रशासनाने केली आहे का? Public Liability Insurance आहे का? पाळण्यांची सुरक्षा व तांत्रिक तपासणी झाली आहे का? याचे उत्तर प्रशासनाने जनतेसमोर द्यावे,
अशी मागणी करण्यात आली आहे.“सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कारवाई का होत नाही? तक्रारदाराला माहिती देण्यास टाळाटाळ का केली जाते? संबंधित व्यवसायिकावर कारवाई न करण्यामागचे कारण काय?” असे सवाल निलेश गजरमल यांनी उपस्थित केले आहेत.
बारामती शहर पोलीस आणि नगरपरिषदेला थेट सवाल बारामती शहर पोलीस प्रशासन आणि बारामती नगरपरिषद ही सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणारी यंत्रणा आहे. मग माळावरची देवी परिसरातील पाळण्यांबाबत इतके प्रश्न उपस्थित होत असताना प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका का घेतलेली नाही?दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याची वाट पाहणार की दुर्घटनेपूर्वीच सुरक्षा तपासणी करून नियमांचे उल्लंघन असल्यास कारवाई करणार?हा प्रश्न आता बारामतीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
निलेश गजरमल यांची मागणीसंबंधित पाळण्यांची तातडीने पाहणी करावी, सर्व परवानग्या व परवानगीतील अटी तपासाव्यात, सुरक्षा उपाययोजना आणि सार्वजनिक दायित्व विम्याची खात्री करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. तसेच तक्रारदार म्हणून केलेल्या पाठपुराव्यावर प्रशासनाने लेखी माहिती द्यावी, अशी मागणी निलेश गजरमल यांनी केली आहे.
आता प्रश्न एकच माळावरच्या देवी परिसरातील आकाशी पाळण्यांवर प्रशासनाची कारवाई कधी होणार?दुर्घटनेची वाट पाहणार की त्याआधीच प्रशासन जागे होणार?बारामती शहर पोलीस प्रशासन आणि बारामती नगरपरिषद यावर काय उत्तर देणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.








