
मेडद, ता. बारामती — “विरोधकांना विरोध कामातून करायचा असतो, ट्रोलिंग करून नाही,” अशी तीव्र भावना मेडद गावातील नागरिकांमध्ये व्यक्त होत असल्याची चर्चा सध्या गावात जोर धरत आहे. गावात रस्ते, पाणी, गटार, शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा मुरमीकरणाचे विकासकाम सुरू असताना त्या कामाला सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या माध्यमातून उत्तर दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ग्रामस्थांच्या चर्चेनुसार, गावाचा प्रमुख प्रतिनिधी हा विकासकामांना प्रोत्साहन देणारा, सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाच्या प्रगतीचे नेतृत्व करणारा असावा; मात्र विरोधकांच्या विकासकामांवर ट्रोलिंग करून राजकीय टीका करणे हे प्रतिनिधित्वाला शोभणारे आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “ट्रोलिंगने गावाचा विकास होतो का? रस्ते, पाणी, गटार, शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा आणि रोजगाराचे प्रश्न ट्रोल पोस्टमुळे सुटणार आहेत का?” असे प्रश्न गावातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट टाकून समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकाम करून दाखवावे, अशी मागणीही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. गावातील अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की,
WhatsApp आणि Facebook वर सक्रिय राहणे वेगळे आणि गावासाठी मोलाचे योगदान देणे वेगळे. केवळ ट्रोलिंग करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न हा समाजहिताचा पर्याय होऊ शकत नाही. “जर ट्रोलिंग करणाऱ्यांनी गावासाठी एखादे ठोस विकासकाम केले असेल, तर ते जनतेसमोर जाहीर करावे,” अशी खुली मागणी चर्चेतून पुढे येत आहे. विशेष म्हणजे, मेडद गावातील नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून प्रमुख प्रतिनिधीसह विरोधी बाजूचे तब्बल नऊ सदस्य निवडून दिले आहेत.
म्हणजेच ग्रामस्थांनी सर्व प्रतिनिधींना लोकशाही पद्धतीने स्वीकारले असून, त्यांचेही गावाच्या विकासात तितकेच प्रतिनिधित्व आहे. अशा परिस्थितीत विरोधी सदस्य व पॅनल प्रमुख यांना सतत ट्रोल करणे हे लोकशाही मूल्यांना धरून आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गावातील विकासकामांच्या वेळी सदस्यांना व विरोधी पॅनलला लक्ष्य करून करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगमुळे नागरिकांमध्ये नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
“काम करणाऱ्याला काम करू द्यायचे नाही आणि स्वतःच्या विकासकामांचाही हिशोब द्यायचा नाही, ही कोणती नेतृत्वाची पद्धत?”
असा सवाल अनेक ग्रामस्थांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. आज गावाने मतदानाचा अधिकार बजावून प्रमुख पदावर प्रतिनिधी निवडून दिला तो गावाच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी, समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी आणि सर्वांना सोबत घेऊन प्रगती साधण्यासाठी. मात्र जर विकासापेक्षा ट्रोलिंगलाच अधिक महत्त्व दिले जात असेल, तर “आपण प्रतिनिधी निवडताना चूक केली का?” हा प्रश्न आता दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे चर्चिला जाऊ लागल्याचे चित्र आहे. नागरिकांची अपेक्षा स्पष्ट आहे.
विरोधाला उत्तर ट्रोलिंगने नव्हे, तर विकासकामांनी द्यावे.
गावहित, समाजहित आणि लोकांच्या विश्वासाला प्राधान्य देणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करू शकते. मेडद गावातील नागरिक आता सोशल मीडिया पोस्टपेक्षा प्रत्यक्ष विकासाचा लेखाजोखा मागत असून, ट्रोलिंग करणाऱ्यांनी आपल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर मांडावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
“सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं.” विरोधकांना उत्तर हे शब्दांनी नव्हे, तर विकासकामांनी दिले जाते — अशीच अपेक्षा आज मेडदच्या जनतेची आहे.








