
भाजप जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नितीन भामे यांचा घणाघात; केवळ प्रसिद्धीसाठी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न
बारामती:–
बारामती शहर आणि परिसरात गुन्हेगारी वाढल्याचा विपर्यास करणे आणि अमली पदार्थांसारख्या गंभीर सामाजिक मुद्द्याचे राजकीय भांडवल करणे, हा आमदार रोहित पवार यांचा केवळ एक ‘राजकीय स्टंट’ आहे. बारामतीची प्रतिमा जाणीवपूर्वक डागाळण्याचा हा प्रयत्न अत्यंत निषेधार्ह असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ॲड. नितीन रामचंद्र भामे यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामतीमधील अमली पदार्थांच्या सेवनाबाबत भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर ॲड. भामे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पवारांच्या भूमिकेचा कडक शब्दांत समाचार घेतला.
सामाजिक चळवळीऐवजी ‘टार्गेट’ करण्याचे राजकारण
ॲड. भामे यांनी म्हटले आहे की, अमली पदार्थ आणि नशाखोरी विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी मिळून एक व्यापक ‘सामाजिक चळवळ’ उभी करणे ही काळाची गरज आहे. मात्र, रोहित पवार यांनी या विषयाचा वापर केवळ स्थानिक नेतृत्व, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यासाठी केला आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे मूळ समस्या सुटण्याऐवजी समाजात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
पोलीस प्रशासनाचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न
“विशिष्ट नेत्यांनंतरच बारामतीत गुन्हेगारी वाढली” असे विधान रोहित पवार यांनी केले आहे. यावर बोलताना भामे म्हणाले की, “गुन्हेगारी ही एक सामाजिक विकृती असून तिचा संबंध कोणत्याही एका नेत्याच्या काळाशी जोडणे हा बालिशपणा आहे. अशा विधानांमुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम रोहित पवार करत आहेत.”
सहकार्याऐवजी राजकीय स्वार्थ
एक लोकप्रतिनिधी म्हणून जर रोहित पवार यांच्याकडे काही ठोस माहिती होती, तर ती गोपनीयरीत्या पोलिसांना देऊन तपासात सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र, गांभीर्य दाखवण्याऐवजी केवळ कॅमेऱ्यासमोर आरोप करून त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या संवेदनशील विषयाचे भांडवल केल्याचा आरोपही ॲड. नितीन भामे यांनी केला आहे.









